____________________________
वयक्तीवेध: पी. के. बॅनर्जी
____________________________
- क्रिकेटवेडय़ा भारतीय वाळवंटातले एक फुटबॉलप्रेमी ओअॅसिस म्हणजे बंगाल. तिथे कित्येक वर्षे ज्यांच्या नुसत्या नावाने लाखभर प्रेक्षक मैदानाकडे खेचले जात, ते नाव म्हणजे पी. के. बॅनर्जी.
- १९८२नंतर दूरदर्शनवर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे उपान्त्य आणि अंतिम सामने दाखवले गेले. १९८६पासून मात्र प्रत्येक विश्वचषक स्पर्धा भारतात दिसतेच. सुरुवातीच्या काही स्पर्धासाठी तज्ज्ञ टिप्पणी देण्यास पी. के. हमखास उपस्थित असायचे. त्या वेळी एखाद्या फुटबॉलपटूने कशा प्रकारे खेळायला हवे होते, किंवा एखाद्या संघाने कसा उत्तम बचाव केला याविषयीच्या त्यांचे शब्द नेमके आणि मोलाचे असत.
- त्यामुळेच कदाचित त्यांनी सांगितलेल्या क्ऌप्त्या चटकन समजत. एक खेळाडू, प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द भारतीय फुटबॉलमधील सर्वात यशस्वी ठरली. १९व्या वर्षी ते कारकीर्दीतला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळले, वयाच्या १५व्या वर्षी पहिला क्लब सामना.
- शिकण्यासाठी जमशेदपूरला होते आणि कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना ईस्टर्न रेल्वेमध्ये नोकरी धरावी लागली. पण त्यांचा वेग आणि कौशल्य वादातीत होते. विंगर (बगलेवरून)व सेंटर (मध्यावर) अशा दोन्ही स्थानांवर ते सारख्याच सहजतेने खेळायचे.
- या बहुपैलुत्वामुळेच कलकत्ता फुटबॉल लीगमध्ये १९५८मध्ये ईस्टर्न रेल्वेने अजिंक्यपद पटकावले; तेही ईस्ट बंगाल, मोहन बागान वा मोहमेडन स्पोर्टिगची मक्तेदारी मोडून! या तीन बडय़ा संघांकडून न खेळताही राष्ट्रीय संघात निवड झालेले ते पहिलेच.
- मेलबर्न ऑलिम्पिक(१९५६) उपांत्यपूर्व सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा ४-२ असा पराभव भारताने केला. त्या सामन्यात पी. के. यांनी गोल केला नाही, पण प्रत्येक गोलसाठी मोलाचे पासेस पुरवले. त्या स्पर्धेत भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर राहिला.
- जागतिक स्पर्धेतली भारताची फुटबॉलमधली ती आजवरची सर्वोत्तम कामगिरी. १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये ते भारतीय संघाचे कर्णधार होते. फार यश नाही मिळाले; परंतु फ्रान्सविरुद्ध १-१ अशी बरोबरी झालेल्या सामन्यातील त्यांनी झळकावलेला गोल संस्मरणीय ठरला.
- १९६२ एशियाडमध्ये भारताने फुटबॉल सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात भारताने बलाढय़ दक्षिण कोरियाला हरवले. पी. के. यांनीही एक गोल केला. पुढे अनेक स्पर्धात त्यांनी भारताचे नेतृत्व केले. प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या. बँकॉक एशियाडमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने कांस्यपदक जिंकले.
- हे भारताचे फुटबॉलमधील आजवरचे शेवटचे महत्त्वाचे पदक! म्हणजे पहिली मोठी कामगिरी ते शेवटची मोठी कामगिरी या कालखंडातील महत्त्वाचे किमयागार पी. के. बॅनर्जीच ठरले. आज भारतात फुटबॉलवेडही वाढत असताना.
- आंतरराष्ट्रीय मैदानावर भारतीय संघाची कामगिरी त्या काळातील भारतीय संघाच्या जवळपासही जाणारी नाही. ही पोकळी पी. कें.च्या निवृत्तीनंतर निर्माण झाली होतीच. त्यांच्या निधनाने तो संदर्भ अधिक खिन्नगडद झाला.
____________________________
जागतिक क्षयरोग दिवस: 24 मार्च
____________________________
- दरवर्षी 24 मार्चला जगभरात ‘जागतिक क्षयरोग दिवस (World TB Day)’ पाळला जातो. या दिनानिमित्त क्षयरोगाचे (TB) जगभरातले ओझे तसेच प्रतिबंधात्मक व निगा राखण्याचे प्रयत्न याविषयी नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली जाते.
- यावर्षी हा दिवस “इट्स टाइम” या संकल्पनेखाली पाळण्यात आला.
- जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) “फाइंड. ट्रीट, ऑल. #एंड टीबी” ही मोहीम ग्लोबल फंड अँड स्टॉप टीबी पार्टनर्शिप यांच्या संयुक्त सहकार्याने सुरू केली.
▪️भारतामधली परिस्थिती आणि उपाययोजना
- जगभरात 6-7 कोटी लोक या आजाराने ग्रस्त आहेत आणि क्षयरोगामुळे दरवर्षी जवळजवळ 2.5-3 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. भारतात दर तीन मिनिटाला दोन क्षयरोगींचा मृत्यू होतो, तर दररोज 40 हजार लोकांना याचे संक्रमण होते.
- भारतात जवळजवळ 92 टक्के इतक्या उच्च प्रमाणात HIV बाधित क्षयरोग रुग्ण आहेत, ज्यांना अॅंटी-रेट्रोव्हायरल थेरपी दिली जात आहे. भारतात वर्षभरात सुमारे 18 लक्ष लोकांना क्षयरोग होतो.
- औषध प्रतिरोधक क्षयरोगावरील उपचाराचे परिणाम सुधारण्यासाठी “बेडाक्युलाइन” या नावाचे नवीन क्षयरोगाविरोधी औषध सशर्त प्रवेश कार्यक्रम (CAP) अंतर्गत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रोगासंबंधी खासगी चिकित्सक शोधण्यासाठी “ई-निक्षय” व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.
- 24 मार्च 1882 रोजी डॉ. रॉबर्ट कॉच यांना क्षयरोगाचे कारक - ‘TB बॅसीलस’ – या जिवाणूचा शोध लागला. क्षयरोग मायकोबॅक्टेरियम ट्यूबरकुलोसिस जीवाणूमुळे होतो. क्षयरोग मुख्यत: हवेच्या माध्यमातून पसरणारा रोग आहे.
- क्षयरूग्णाचे निदान झालेल्या रूग्णास DOTS प्रोव्हायडरमार्फत औषधोपचार दिला जातो.
____________________________
राष्ट्रीय महासंगणकीय अभियान
____________________________
- भारत सरकारने यावर्षीच्या अंती देशभरातल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय तंत्रज्ञान संस्था, IISER आणि राष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये राष्ट्रीय महासंगणकीय अभियान (National Supercomputing Mission -NSM) अंतर्गत अकरा नवीन प्रणाल्या प्रस्थापित करण्याचे ध्येय ठेवले आहे आणि त्यांची एकूण संगणकीय क्षमता 10.4 पेटा फ्लॉप (सेकंदात 10^15 फ्लोटिंग पॉईंट ऑपरेशन) इतकी करण्यात येणार आहे.
- इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग या अभियानाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाची अंमलबजावणी भारतीय विज्ञान संस्था (IISc), बंगळुरू आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडवांस्ड कम्प्युटिंग (सी-डॅक), पुणे या संस्था करीत आहेत.
▪️अभियानाची उद्दिष्टे
- संशोधक, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप उद्योग आणि इतर उद्योगांच्या वाढत्या संगणकीय मागण्यांची पूर्तता करण्यासाठी देशात पायाभूत सुविधा उभारणे आणि ते भारतातच विकसित केले करणे.
- 2022 सालापर्यंत राष्ट्रीय महत्व असलेल्या संस्थांमध्ये काही टेरा फ्लॉप (सेकंदात 10^12 फ्लोटिंग पॉईंट ऑपरेशन) ते शेकडो टेरा फ्लॉप या क्षमतेत असलेल्या महासंगणकांचे जाळे तसेच 3 पेटा फ्लॉप (PF) पेक्षा जास्त क्षमता असलेल्या तीन प्रणाल्या प्रस्थापित करणे.
▪️इतर बाबी
- वाराणसीच्या IIT (BHU) या संस्थेत स्वदेशी निर्मित प्रथम महासंगणक प्रस्थापित केले गेले, ज्याचे नाव "परम शिवाय" असे ठेवण्यात आले.
- “परम शक्ती” महासंगणक IIT खडगपूर या संस्थेत आहे. भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (IISER), पुणे येथे “परम ब्रह्मा” महासंगणक आहे.
- एप्रिल 2020 पर्यंत IIT कानपूर, IIT हैदराबाद आणि जेएन सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च, बंगळुरू या संस्थांमध्ये आणखी तीन महासंगणक प्रस्थापित केले जाणार आहेत.
- सी-डॅक संस्थेच्या बंगळुरू केंद्रात एक मध्यम-स्तरीय 650 टेरा फ्लॉप क्षमतेचा महासंगणक प्रस्थापित केला जाणार आहे.
____________________________