____________________________
  राज्यसभेत ‘जम्मू व काश्मीर विनियोग विधेयक’ मंजूर
____________________________


- राज्यसभेत 24 मार्च 2020 रोजी ‘जम्मू व काश्मीर विनियोग विधेयक-2020’ मंजूर झाले.

▪️ठळक बाबी

- जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 1 लक्ष कोटी रुपयांच्या अपेक्षित खर्चासह ही विधेयक तयार करण्यात आले आहे.

- विधेयकानुसार, केवळ 10 टक्के निधी सुरक्षिततेच्या उद्देशाने खर्च केला जाऊ शकतो आणि उर्वरित रक्कम प्रदेशाच्या विकासावर खर्च केला जाणार.

- सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या पाच महिन्यांसाठी 55,317.81 कोटी रुपयांच्या स्वतंत्र खर्चाची योजनादेखील सादर केली.

- तर लडाख केंद्रशासित प्रदेशासाठी अर्थसंकल्पाचे अंदाजपत्रक 5,754 कोटी रुपये एवढे निश्चित केले गेले.

____________________________
  ग्रेगरी मार्ग्युलिस आणि हिलेल फर्स्टेनबर्ग यांना 2020 या सालाचा एबेल पारितोषिक जाहीर
____________________________


- अमेरिकेचे गणितज्ञ ग्रेगरी मार्ग्युलिस आणि इस्त्राएलचे गणितज्ञ हिलेल फर्स्टेनबर्ग यांना संयुक्तपणे 2020 या सालाचा एबेल पारितोषिक जाहीर झाला आहे.

- ग्रेगरी मार्ग्युलिस अमेरिकेच्या येल विद्यापीठात कार्यरत आहेत आणि हिलेल फर्स्टेनबर्ग इस्त्राएलच्या जेरुसलेम विद्यापीठात कार्यरत आहेत.

- त्यांची संख्या शास्त्र आणि कॉम्बिनेटोरिक्स याबाबतच्या सिद्धांतामध्ये दिलेल्या योगदानासाठी या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

- ‘एबेल पारितोषिक’ हा गणित शास्त्र क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तीला दिला जाणारा पुरस्कार आहे.

- हा पुरस्कार नॉर्वेजियन अकॅडेमी ऑफ सायन्स अँड लेट्टर्स या संस्थेकडून दिला जातो. 2003 सालापासून हा पुरस्कार दरवर्षी दिला जात आहे.

- पुरस्कार स्वरूपात 6 दशलक्ष क्रोनोर (सुमारे 715,000 डॉलर) रोख बक्षीस दिले जाते.

____________________________
  वयक्तीवेध : अल्बर्ट उद्रेझो
____________________________


- ‘अ‍ॅस्टरिक्स’ आणि ‘ओबेलिक्स’ ही जोडी इंग्रजी नियतकालिकांतील कॉमिक स्ट्रिपमध्ये आता-आतापर्यंत दिसे. टोपीवर पंख असलेला अ‍ॅस्टरिक्स आणि फुटबॉलसारखा ढेरपोटय़ा ओबेलिक्स यांच्या करामती आणि किस्से हे मुळात फ्रेंच भाषेत अवतरले, पण इंग्रजीतून सर्वदूर पोहोचले.

- या दोघांना अजरामर रूप देणारे रेखाचित्रकार अल्बर्ट उद्रेझो नुकतेच निवर्तले. वयाच्या ९२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने २४ मार्चला त्यांना गाठले. उद्रेझो हे चित्रकार, तर रेने ग्रॉसीनी हे लेखक या दोघा तरुणांनी साधारण वयाच्या पस्तिशीत असताना ‘अ‍ॅस्टरिक्स आणि ओबेलिक्स’ या जोडीला जन्म दिला. सन होते १९६१, म्हणजे चार्ल्स द गॉल यांची राजवट आणखी नऊ वर्षे राहणार होती!अ‍ॅस्टरिक्स हादेखील ‘अ‍ॅस्टरिक्स द गॉल’! पण स्पेलिंग निराळे, कधी काळी गॉल जमातीचे लोक युरोपात राहात आणि त्यांनी म्हणे कुठल्याशा शक्तीमुळे आपल्या गावावरील ज्यूलियस सीझरचे आक्रमण थोपवले होते.

- त्या ‘गॉल’पैकी हा अ‍ॅस्टरिक्स. या व्यक्तिरेखेचे अनेक संदर्भ हे समकालीन राजकारणाशी, समाजकारणाशी जुळत. सूचक कोटय़ा करीत जळजळीत राजकीय उपरोध वाचकांपर्यंत पोहोचवणे, हे फ्रेंच विनोदाचे वैशिष्टय़. ते अ‍ॅस्टरिक्सच्या या दोघा कर्त्यांमध्येही होते. उद्रेझो कुटुंबीय मूळचे इटालियन.

- अल्बर्ट यांचा जन्म इटलीतला, पण अगदी बालपणी आई-वडील पॅरिसजवळ स्थायिक झाले. त्यामुळे अल्बर्ट यांचे शिक्षण फ्रान्समध्येच, फ्रेंच भाषेतच झाले.

-  मुलांच्या मासिकासाठी काम करताना त्यांना रेने ग्रॉसीनी भेटले आणि पाच वर्षांत ‘अ‍ॅस्टरिक्स’ची कल्पना साकार झाली. अ‍ॅस्टरिक्स कॉमिक्सचे पहिले संकलित बाड निघेपर्यंत १९६९ साल उजाडले, पण पुढल्या अवघ्या १८ वर्षांत तब्बल २५ बाडे तयार झाली.

- इतकी या चित्रकथेची मागणी आणि तितकीच या दोघांची प्रतिभा! मात्र उद्रेझो- ग्रॉसिनी यांचे हे सहकार्य १९७७ मध्ये, ग्रॉसिनी यांच्या मृत्यूमुळे संपुष्टात आले.
 त्याहीनंतर एकहाती, २००९ सालापर्यंत उद्रेझो यांनी ही चित्रकथा चालविली.

-  शाब्दिक कोटय़ांऐवजी दृश्यावर भर दिला जाऊ लागला, तो याच काळात. अ‍ॅस्टरिक्स, ओबेलिक्स, तसेच ‘डॉग्मॅटिक्स’ हा त्यांचा कुत्रा या तिघांचेही भावदर्शन उद्रेझो असे काही घडवीत की, शब्द नसले तरी चालत.

- त्यांच्या प्रत्येक पुस्तकाला दशलक्षांहून अधिक प्रती खपण्याचा मान तर मिळालाच, पण फ्रान्सचा ‘लीजन ऑफ ऑनर’, नेदरलँड्सचा सर्वोच्च किताब, अनुवादित साहित्यातून विश्वसंवाद घडवून आणल्याबद्दल युनेस्कोचा पुरस्कार असे महत्त्वाचे सन्मान त्यांना लाभले.

- कॉमिक चित्रपट्टीतली पात्रे स्वच्छ, नितळ आणि म्हणून छानच दिसणारी हवी, हा अमेरिकी वा जपानी शिरस्ता मोडणाऱ्या उद्रेझोंची आठवण कॉमिक-दर्दीमध्ये नेहमीच राहील.

____________________________
  कद्रीय विद्यालयाच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द
____________________________


- शाळेपासून महाविद्यालयापर्यंत सर्वच महत्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

- करोना व्हायरसमुळे पुढचे २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये राहणार आहे. शाळेपासून महाविद्यालयापर्यंत सर्वच महत्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

- काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांना पुढच्यावर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला. अन्य राज्यांनी सुद्धा परीक्षा ने घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

- आता भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय विद्यालयाने २०१९-२० या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

- २००९ सालच्या शिक्षणअधिकार कायद्यातंर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे

____________________________