चालू घडामोडी : २७ मार्च


____________________________
'स्टेट होम इंडिया विथ बुक्स': राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त संस्थेचा उपक्रम

____________________________

- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त संस्था (NBT) देशात एक नवा उपक्रम राबवित आहे.

- लोकांना घरबसल्या मनोरंजनासाठी तसेच वाचनास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 'स्टेट होम इंडिया विथ बुक्स' नावाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

- हा कार्यक्रम 25 मार्च 2020 रोजी आरंभ करण्यात आला असून संचारबंदीच्या कालावधीत चालणार आहे. उपक्रमाच्या अंतर्गत संस्थेच्या संकेतस्थळावर डिजिटल स्वरूपात विक्री केली जाणारी शंभराहून अधिक पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

- ही पुस्तके आसामी, बांगला, बोडो, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, कोकबरोक, मल्याळम, मराठी, मिझो, नेपाळी, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू, संस्कृत आणि उर्दू भाषेत उपलब्ध आहेत.

- मुख्यत्वेकरून लहान मुले आणि तरुण प्रौढांसाठी उपलब्ध असलेल्या पुस्तकांमध्ये शैक्षणिक, चरित्र, कल्पनारम्य, विज्ञानकथा, शिक्षकांसाठी पुस्तिका अश्या विविध शैलींचा समावेश आहे.

▪️राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त संस्था (NBT) विषयी

- राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त संस्था (National Book Trust -NBT) याची स्थापना 1957 साली झाली. संस्थेची स्थापना मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत उच्च शिक्षण विभागाकडून करण्यात आली होती.

-  भारतीय भाषा तसेच इंग्रजी भाषेमध्ये गुणवत्तापूर्ण साहित्याच्या प्रसाराला प्रोत्साहन देणे आणि पुस्तकांना योग्य दरात उपलब्ध करुन देणे, हा या संस्थेचा उद्देश्य आहे.
____________________________
भारतीय शास्त्रज्ञांनी जैविकदृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेले गव्हाचे वाण विकसित केले
____________________________


- कुपोषण निर्मूलनाचा एक प्रयत्न म्हणून त्यादृष्टीने चाललेल्या संशोधनामधून पुण्याच्या आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट (ARI) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविकदृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेले गव्हाचे वाण विकसित केले. या गहूला ‘MACS 4028’ असे नाव देण्यात आले आहे.

▪️गव्हाची वैशिष्ट्ये

- या नव्या गहूमध्ये 14.7 टक्के एवढे उच्च प्रमाणात प्रथिने असल्याचे आढळून आले आहे. तसेच जस्तचे प्रमाण 40.3 ppm आणि लोहचे प्रमाण 46.1 ppm एवढे आहे.

- नवा गहू ‘डुरम गहू’ या प्रकारातला आहे, जो कोरडा प्रदेशात उगवतो. मुख्यत: पास्ता बनविण्यात वापरला जातो आणि म्हणून पास्ता गहू किंवा मकरोनी गहू म्हणून देखील ओळखला जातो.

- नवा गहू हे बुटक्या प्रकारातले वाण आहे आणि त्याची संपूर्ण वाढ होण्यासाठी 102 दिवसांचा कालावधी लागतो आणि त्याची हेक्टरी 19.3 क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता आहे.

- नवा गहू पर्णनाशक, तणनाशक, तपकिरी किडे, फोलीयर एफिडस् आणि रूट एफिडस् अश्या उत्पादन घटविणाऱ्या रोगांसाठी प्रतिरोधक आहे.

- भारताच्या ‘व्हीजन 2022’, ‘कुपोषण मुक्त भारत’ आणि राष्ट्रीय पोषण धोरणाचे ध्येय साध्य करण्यात मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) यासाठीच्या कृषी विज्ञान केंद्र (KVK) कार्यक्रमात ‘MACS 4028’ गहू समाविष्ट करण्यात आला आहे.

____________________________
कतूहल : पर्यावरण संवर्धनासाठी एक तास.....
____________________________


- वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ) या स्वयंसेवी संघटनेने ‘अर्थ अवर’ची संकल्पना मांडली. त्यावर आधारित मोहीम दरवर्षी जगभर राबवली जाते. या मोहिमेअंतर्गत आपण आपल्या परिसरात, रहिवासी संकुलात, वस्तीत, गाव किंवा शहरात, व्यवसायाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी वर्षांतून एक दिवस हा तास पाळायचा आहे. या तासाभरात आपल्याला शक्य तेवढे विजेवर चालणारे दिवे बंद करायचे आहेत. ही मोहीम दर वर्षी मार्च महिन्याचा शेवटच्या आठवडय़ातील शनिवारी राबवली जाते.

- त्यानुसार यंदाचा ‘अर्थ अवर’ हा उद्या- शनिवार, २८ मार्च रोजी पाळायचा आहे. या दिवशी सायंकाळी ८.३० ते ९.३० आपण सर्वानी या जागतिक मोहिमेत सहभागी व्हायला हवे.

- आजच्या अतिव्यवधानांच्या काळात आपण अनेक गोष्टी स्वत: करायचे विसरू लागलो आहोत. व्यायाम म्हणून काही करू, पण जिने चढून आपण घरात जात नाही. उठून टीव्ही बंद करीत नाही. थोडय़ा अंतरासाठी वाहन शोधतो. उद्वाहन किंवा सरकता जिना शोधतो आणि वापरत राहतो. रात्री घरातले सर्व कोपरे प्रकाशमान करण्याचा प्रयत्न करतो. घरातील टीव्ही समोर प्रेक्षक नसताना चालू असतो. सर्व रस्त्यांवरील दिवे, रेल्वे स्थानक आणि सार्वजनिक ठिकाणचे दिवे, मोठमोठय़ा जाहिरातींचे विजेवर प्रकाशणारे किंवा संगणक संचालित फलक या साऱ्यातून अखंडित वीजप्रवाह वाहत असतो. एकुणात, आपले सर्व जीवन हे वाहणाऱ्या विजेबरोबरच वाहत असते.

- मात्र यासाठी सतत आपण नैसर्गिक स्रोतांचा अनिर्बंध वापर करतो. म्हणूनच जागतिक तापमानवाढ, ऊर्जेचा अनिर्बंध वापर यांबद्दल जागरूकता निर्माण करणारा हा ‘अर्थ अवर’ गरजेचा आहे. परंतु तो या समस्यांवरील उपाय नाही. तर हा तास म्हणजे या समस्यांकडे पाहण्याची, त्याविषयीचे चिंतन करण्याची सवड आहे. पृथ्वीबद्दलची कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याची संधी आहे. २००७ साली सर्वप्रथम सिडनी या ऑस्ट्रेलियामधील शहरात हा दिवस ‘दिवे बंद करा दिवस’ म्हणून पाळला गेला.

-  आता तो पृथ्वीवरील तब्बल सात हजार शहरांत आणि १८७ देशांत पाळला जातो. त्यातून विजेच्या वापराबद्दल आणि एकूणच पर्यावरणाबद्दल जनजागृती होते.
नुसत्या तासाभराच्या ‘अर्थ अवर’मधून कार्बन उत्सर्जन किती कमी झाले किंवा किती वीज वाचली, असा विचार यात अध्याहृत नाही. मात्र, स्वत:च्या कार्बन पदचिन्हांचा (कार्बन फूटप्रिंट्स) विचार करून आपण व्यक्तिगत किंवा समूहाने तसेच उद्योजक किंवा सरकार म्हणून विजेच्या उपयोगाबाबत विवेकी विचार करावा ही अपेक्षा आहे. उद्या सायंकाळी ८.३० ते ९.३० हा एक तासभर नको असलेले विजेचे दिवे आणि इतर विजेची उपकरणे बंद ठेवून आपण पर्यावरण संवर्धनाच्या मोठय़ा प्रवाहात सामील होऊ शकतो.

____________________________
वयक्तीवेध : निम्मी
____________________________


- वयाच्या सोळाव्या वर्षी, १९४९ मध्ये रुपेरी पडद्यावर झळकणारी नवाब बानू म्हणजेच निम्मी ही अभिनेत्री नशीबवानच. मूकपटाचा बोलपट होता होताच स्त्रियांना त्यांच्याच भूमिका करण्याची संधी देऊन भारतीय चित्रपट सामाजिकदृष्टय़ा खूपच पुढारलेला होता. समाजात ‘नटी’ या शब्दाचे संदर्भही बदलू लागले असताना निम्मीने पडद्यावर आगमन केले.

 - त्यानंतर नटीची ‘अभिनेत्री’ झाली आणि समाजात लोकप्रियतेच्या जोरावर वाहवा मिळवणाऱ्या त्या काळातल्या म्हणजे साठच्या दशकातील अन्य अभिनेत्रींमध्ये निम्मीही पुढेच राहिली. त्याचे कारणही वेगळे होते. निम्मीने चित्रपटांमध्ये ग्रामीण भागातील चुणचुणीत युवतीचे दर्शन घडवले आणि त्याने त्या काळातील प्रेक्षकांना अक्षरश: भुरळ घातली. पण निम्मीच्या वाटय़ाला खूप वेगवेगळ्या भूमिकाही आल्या. हे वैविध्य तिच्यासाठी आव्हानात्मक ठरले; तिनेही त्याचे सोने केले.

-  कृष्णधवल चित्रपटांच्या जमान्यातील ती एक आघाडीची अभिनेत्री ठरली. आग्रा येथील मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या निम्मीची आई वहिदा त्या काळातली अभिनेत्री होती आणि गायिकाही.

 - वडील अब्दुल हकीम हे सेनादलासाठी कॉन्ट्रॅक्टर होते. पण नवाब बानूचे निम्मी हे नाव मात्र तिला राज कपूर यांनी दिले. वयाच्या अकराव्या वर्षी पितृछत्र हरवले. तसेही ते दुसऱ्या शहरात राहत असल्याने तिचा त्यांच्याशी तसा संबंधही नव्हता. त्या वेळी मुंबईत येऊन चित्रपटाच्या रुपेरी दुनियेत झळकणे म्हणजे काय, याची फारशी कल्पनाही नसताना निम्मी या व्यवसायात उतरली. पण तिची बहीण या शहरात राहत असल्याने तिला कुटुंबाचा आधारही होता.

- मेहबूब खान यांच्यासारख्या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने निम्मीला अंदाज या चित्रपटाची निर्मिती कशी होते हे पाहायला बोलावले.

- त्या सेटवर तिला राज कपूरही भेटले. त्यामुळे ‘बरसात’ या चित्रपटात तिला भूमिकाही मिळाली. हा तिचा पहिला चित्रपट. त्यानंतर तिला एकदमच भाव मिळू लागला. तिचे सारे आयुष्यच बदलून गेले. दुय्यम भूमिका करत राहूनही तिला सतत प्रकाशझोतात राहता आले. राज कपूर, देव आनंद, दिलीपकुमार यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने तिच्या लोकप्रियतेतही मोठीच भर पडली.

- पण मधुबाला, नर्गिस, सुरैया, गीता बाली, मीना कुमारी यांच्यासारख्या त्या काळात तुफान प्रेक्षकप्रिय अभिनेत्रींसह काम करण्याच्या संधीतील आव्हानही निम्मीने नेमके पेलले. सतत प्रकाशात राहण्याची ही सवय काळापुढे टिकू शकत नाही. तिनेही या व्यवसायातून निवृत्त होऊन विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि ती सहजपणे पडद्यावरून नाहीशी झाली.

- ‘लव्ह अँड गॉड’ या तिच्या शेवटच्या चित्रपटाचे चित्रीकरण १९६३ मध्येच सुरू झाले. पण तो प्रदर्शित झाला १९८६ मध्ये. इतक्या वर्षांनंतरही तिची ओळख प्रेक्षकांच्या मनातून पुसली गेली नाही, हेच तिचे श्रेयस आणि प्रेयस होते. तिच्या निधनाने एक चांगली अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली आहे.

____________________________
Coronavirus : देशातील सर्वात मोठे करोना रुग्णालय ‘या’ राज्यात उभारणार
____________________________


- जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या करोना व्हायरसचा धोका देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ओदिशा सरकार देशातील सर्वात मोठं ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारणार आहे. या भव्य रुग्णालयात तब्बल एक हजार खाटांची व्यवस्था असणार आहे.

- ओदिशा सरकार, कार्पोरेट्स व वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयातून एक हजार खाटांची व्यवस्था असणारे हे देशातील पहिले भव्य असे ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारले जात आहे. यासाठी एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी देखील करण्यात आली आहे.

- ओदिशा सरकार या रुग्णालयाच्या निर्मितीसाठी तयारीला लागले आहे. ओदिशा देशातील पहिले राज्य ठरणार आहे. ज्या ठिकाणी COVID-19 च्या रुग्णांसाठी एवढे मोठे रुग्णालय उभारले जात आहे.

- विशेष म्हणजे ओदिशा राज्यात आतापर्यंत करोनाचे केवळ दोन रुग्ण आढळलेले आहेत. रुग्णालय ओदिशात नेमके कुठं उभारले जाणार हे अद्यापर्यंत स्पष्ट झालेले नाही.

- दुसरीकडे आसाम सरकारने देखीळ करोना व्हायरसच्या संकटाला तोंड देण्यासाठी गुवाहाटीमधील इंदिरा गांधी स्टेडियमवर आयसोलेशन सेंटरची निर्मिती करण्यास सुरुवात केलेली आहे. आसाममध्ये आतापर्यंत करोनाची बाधा झालेला एकहीजण आढळलेला नाही.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केलं आहे. २१ दिवसांच्या या लॉकडाउनमधील आज (गुरुवार) दुसरा दिवस आहे. हा लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत सुरु असणार आहे.

- तर दुसरीकडे जगभऱातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतानाचे चित्र दिसत आहे. जगभरामध्ये करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ६० हजारहून अधिक झाली आहे.

- देशातील करोनाग्रस्तांची संख्या ६४९ असून मागील २४ तासांमध्ये ४२ नवीन प्रकरणे समोर आली आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्र्यालयाचे जॉइन्ट सेक्रेट्री लव अग्रवाल यांनी दिली आहे.


____________________________

Previous Post Next Post

DOWNLOAD