चालू घडामोडी : 3 एप्रिल

__________________________________
टाळेबंदीचा भंग फौजदारी गुन्हा!
__________________________________
- करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीचा भंग करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई करावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असा आदेश केंद्राने गुरुवारी राज्य सरकारांना दिला आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांना मुख्य सचिवांना यासंबंधी आदेशपत्र पाठवले आहे.

- दिल्लीतील मर्कज निजामुद्दीनमधील घटनेनंतर, तसेच विविध राज्यांमध्ये अजूनही लोक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत असल्यामुळे टाळेबंदीची सक्त अंमलबजावणी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत टाळेबंदी काटेकोरपणे लागू करण्याची विनंती केली.

- तबलिगी जमातमध्ये सहभागी ९ हजारांचे विलगीकरण
‘मर्कज निजामुद्दीन’मधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या तबलिगी जमातच्या ९ हजार अनुयायांचे देशभरात विविध राज्यांमध्ये विलगीकरण करण्यात आले. त्यात १,३०६ परदेशी नागरिक असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून गुरुवारी देण्यात आली. मर्कजमधील अनुयायी वाढत्या करोना रुग्णांचा प्रमुख स्रोत बनल्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना या अनुयायांसाठी शोधमोहीम राबवण्याचा आदेश दिला होता.

- त्यानंतर आतापर्यंत नऊ हजार तबलिगी जमातचे कार्यकर्ते, त्यांच्याशी निगडित व्यक्ती आणि त्यांची ठिकाणे शोधून काढण्यात राज्यांना यश आले.
दिल्लीत सुमारे २ हजार अनुयायी होते. त्यापैकी १५० परदेशी नागरिक होते. दिल्लीत १८०४ अनुयायांना विलगीकरण कक्षांत ठेवण्यात आले आहे. ३३४ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे केंद्रीय गृह संयुक्त सचिव पुण्यसलिल श्रीवास्तव यांनी सांगितले.

- ९ धर्मगुरुंविरुद्ध गुन्हा
नवी दिल्लीतील निझामुद्दीन येथे गेल्या महिन्यात झालेल्या तबलिगी जमातच्या धार्मिक मेळाव्यात सहभागी होऊन परतलेल्या आणि नेपाळच्या सीमेवरील एका मदरशात लपून बसलेल्या नऊ धर्मगुरूंविरुद्ध पोलिसांनी गुरुवारी एफआयआर दाखल केला.

- लोकसेवकाने ठरवून दिलेल्या कर्तव्याचा अनादर करणे, प्राणघातक रोगाचा संसर्ग पसरू शकेल असे निष्काळजी कृत्य करणे आणि रोगाचा फैलाव करू शकणारे मारक कृत्य अशा आरोपांखाली या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- अमरोहा येथील रहिवासी असलेले नऊ मौलाना पोलिसांना बुधवारी महिपूर भागातील जमुनाहा वस्तीतील एका मदरशात लपून असलेले आढळले. ते १३ मार्चला येथे आले आणि एका मशिदीतही थांबले होते, असे पोलीस अधीक्षक अनुप कुमार यांनी सांगितले.

- या लोकांनी त्यांच्या वास्तव्याबाबत प्रशासनाला माहिती दिली नाही, किंवा स्वत:हून वैद्यकीय तपासणीही करून घेतली नाही. त्यांना मदरशातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
‘मर्कज’मुळे ९ राज्यांत ४०० बाधित : तेलंगणामुळे मर्कजमधील बाधित रुग्णांची माहिती उघड झाली. त्यानंतर मर्कजमधून अनुयायी आंध्र प्रदेश, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, दिल्ली, अंदमान-निकोबार, जम्मू-काश्मीर, पुडुचेरी, राजस्थान आणि आसाम या राज्यांत प्रामुख्याने गेले. तिथे त्यांचा शोध घेण्यात आला असून आतापर्यंत मर्कजमधील कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी ४०० अनुयायी करोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तमिळनाडू १७३, राजस्थान ११, अंदमान ९, दिल्ली ४७, पुडुचेरी २, जम्मू-काश्मीर २२, तेलंगणा ३३, आंध्र प्रदेश ६७ आणि आसाम १६ रुग्ण आढळले आहेत. येत्या दिवसांमध्ये आणखीही रुग्ण सापडण्याची शक्यता असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.

▪️आदेशात काय?
* टाळेबंदीचे उल्लंघन करणाऱ्या आणि खोटे दावे करणाऱ्या लोकांविरुद्ध भारतीय दंड विधानातील, तसेच आपदा व्यवस्थापन कायदा २००५ मधील सुयोग्य तरतुदींनुसार गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश केंद्र सरकारने गुरुवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले.

* ‘करोनाला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांचे उल्लंघन करणारी कुठलीही व्यक्ती आपदा व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० नुसार, तसेच भादंविच्या कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहील’ असे २४ मार्चला जारी केलेल्या टाळेबंदीच्या उपाययोजनांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे, असे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

* आपदा व्यवस्थापन कायदा आणि भारतीय दंड विधान यांच्यातील दंडात्मक तरतुदी यांचा सरकारी अधिकारी आणि नागरिक यांच्या माहितीसाठी व्यापक प्रचार करावा, तसेच कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी टाळेबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्यांतील सुयोग्य तरतुदीनुसार कारवाई करतील, हेही सांगितले जावे, असेही भल्ला म्हणाले.

_________________________________________
यदाची विम्बल्डन स्पर्धा रद्द
______________________________
- करोनामुळे ब्रिटनमधील परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा रद्द करण्याची वेळ संयोजकांवर ओढवली आहे.

- फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा तसेच ७ जूनपर्यंतच्या सर्व स्पर्धा रद्द झाल्यामुळे आता ऑल इंग्लंड क्लबकडे नैसर्गिक हिरवळीवर होणारी ही एकमेव ग्रँडस्लॅम स्पर्धा रद्द करण्यावाचून कोणताही पर्याय उरलेला नव्हता. २८ जूनपासून ही स्पर्धा सुरू होणार होती.

- मात्र संपूर्ण जग करोनासारख्या भीषण परिस्थितीचा सामना करत असताना ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय अखेर संयोजकांनी घेतला आहे. बुधवारी याबाबतची घोषणा करण्यात आली.
‘‘करोनामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले असताना ऑल इंग्लंड क्लबचे मुख्य मंडळ तसेच व्यवस्थापन समिती ही स्पर्धा रद्द झाल्याची घोषणा करत आहे.

-  ब्रिटनमधील जनता, परदेशातून येणारे चाहते तसेच खेळाडू, पाहुणे, सदस्य, कर्मचारी, स्वयंसेवक, कंत्राटदार यांच्या आयुष्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याचबरोबर समाजाचे हित जपण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही ही स्पर्धा रद्द करत आहोत. तिकीट विकत घेतलेल्यांचे सर्व पैसे परत केले जातील अथवा पुढील वर्षी त्याच दिवशीचे तिकीट त्यांना दिले जाईल. सर्व तिकिटधारकांशी आम्ही वैयक्तिकपणे संपर्क साधणार आहोत,’’ असे ऑल इंग्लंड क्लबच्या पत्रकात म्हटले आहे.

 - तीन वेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावणारा बोरिस बेकर याने अंतिम निर्णय घेण्याआधी संयोजकांनी बराच वेळ घ्यावा, अशी विनंती के ली होती.

-  ‘‘एप्रिलच्या अखेरीस विम्बल्डनच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात यावा. संयम हाच त्यावर एकमात्र उपाय आहे,’’ असे बोरिस बेकरने म्हटले होते. तसेच २००६ साली विम्बल्डन जिंकणारी अव्वल महिला टेनिसपटू अ‍ॅमेली मॉरेस्मो हिने यंदाची विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

______________________
डकवर्थ-लुइसचे जनक टोनी लुइस यांचे निधन
________________________________
- क्रिकेटमधील डकवर्थ-लुइस प्रणालीचे जनक टोनी लुइस यांचे बुधवारी लंडन येथे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) ही घोषणा केली.

- टोनी यांनी गणितज्ञ फ्रँक डकवर्थ यांच्यासोबत डकवर्थ-लुइस पद्धत १९९७ मध्ये अमलात आणली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) १९९९ मध्ये ती स्वीकारली. 

- डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास गणिताची आकडेमोड करत षटके कमी करण्यात येतात. लुइस यांची ही प्रणाली क्रिकेटमध्ये चांगलीच गाजली. अजूनही सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ-लुइस प्रणालीचा आधार घेतला जातो. लुइस यांना क्रिकेट आणि गणितातील या संशोधनाबद्दल ‘एमबीई’ या ब्रिटनमधील सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले.

- ‘आयसीसी’कडून लुइस यांना श्रद्धांजली
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टोनी लुइस यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे. ‘‘सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास धावांचे लक्ष्य ठेवण्याची पद्धत लुइस आणि फ्रँ क यांनी दोन दशकांपूर्वी नव्याने अमलात आणली.

-  लुइस यांचे योगदान सदैव स्मरणात राहील,’’ असे ‘आयसीसी’ने म्हटले आहे.

______________________________________________________
कतूहल : राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था
____________________________
- वाढलेली सागरी वाहतूक; रासायनिक कारखाने, कंपन्या आणि घरांमधून समुद्रात सोडले जाणारे प्रदूषित पाणी; समुद्रात साठणारा प्लास्टिकचा प्रचंड कचरा; मोठय़ा प्रमाणावर होणारी यांत्रिक मासेमारी या सगळ्यांचा दुष्परिणाम सागरी पर्यावरणावर होत आहे. 

- याबरोबरच समुद्रात इंधन आणि वाळूसाठी उत्खनन होते. गाळ एकाच जागी साचतो. याचा परिणाम जलचरांवर होतो. या सर्व समस्यांवर अभ्यास आणि संशोधन होणे गरजेचे आहे. याच उद्देशाने १९६६ साली राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी- एनआयओ) या संस्थेची स्थापना करण्यात आली.

- या संस्थेचे मुख्यालय गोव्यातील डोना पावला येथे असून कोची, मुंबई आणि विशाखापट्टणम येथे प्रादेशिक केंद्रे आहेत. दिल्ली येथील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) च्या घटक प्रयोगशाळांपैकी एनआयओ ही एक संस्था आहे. मोठय़ा संख्येने असलेले समुद्र शास्त्रज्ञ आणि योग्य समुद्री संशोधन या पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेली सीएसआयआरची एनआयओ ही संस्था महासागर विज्ञानातील प्रगत शिक्षणाचे केंद्र आहे.

- १९६० च्या दशकात आंतरराष्ट्रीय हिंद महासागर मोहिमेनंतर १ जानेवारी १९६६ रोजी एनआयओची स्थापना करण्यात आली. आज ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली असून या संस्थेमार्फत हिंद महासागरातील समुद्रशास्त्रीय वैशिष्टय़ांचे संशोधन केले जाते. आतापर्यंत येथे पाच हजारांहून अधिक विषयांवर संशोधन- लेखन झाले आहे.

- एनआयओच्या गोवा मुख्यालयात तसेच प्रादेशिक केंद्रांवर अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत. यात ‘आर. व्ही. सिंधू संकल्प’ आणि ‘आर. व्ही. सिंधू साधना’ या दोन समुद्रीशास्त्रीय निरीक्षणासाठी सुसज्ज अशा जहाजांचा समावेश आहे.

-  अभ्यासासाठी तब्बल १५ हजार पुस्तके
आणि २० हजार शोधनियतकालिके असा ज्ञानसाठाही येथे आहे.
संस्थेत अनेक संशोधन घटकांचा समावेश आहे. मुख्यत्वे हिंदी महासागर जैविक केंद्र (आयओबीसी), जैविक समुद्र विज्ञान विभाग, भौतिक समुद्रशास्त्र विभाग, नियोजन आणि विदा विभाग, इत्यादी. गोव्यातील फील्ड युनिट मे १९६७ मध्ये सुरू केले गेले.

- आपल्या सभोवतालच्या समुद्रांबद्दल अभ्यास आणि पाण्याचे भौतिक, रसायन, जैविक, भूवैज्ञानिक, भू-भौतिक, अभियांत्रिकी आणि प्रदूषण या अनुषंगाने संशोधन करून ते ज्ञान सर्वासाठी खुले करणे, हे या संस्थेचे ध्येय आहे.

______________________________________________
वयक्तीवेध  : ए. रामचंद्रन
______________________

- पृथ्वीचा बराच भाग हा महासागरांनी व्यापलेला आहे, सागरातून आपल्याला माशांच्या रूपाने एक मोठा अन्नस्रोत उपलब्ध झालेला आहे. पण अलीकडे प्रगत मासेमारी तंत्रामुळे माशांचे उत्पादन घटत चालले आहे. कारण माणसाचे क्रौर्य एवढे की, माशांची अंडीही गोळा केली जातील अशा जाळ्या तयार करण्यात आल्या आहेत. 

- त्यामुळे उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होण्याचा धोका आहे. सागरांचे प्रदूषणही मत्स्य व्यवसायास मारक ठरत आहे. मत्स्यशास्त्राचा अभ्यास असलेले इनेगिने लोक देशात आहेत, त्यातील एक म्हणझे डॉ. ए. रामचंद्रन. त्यांच्या निधनाने मत्स्यशास्त्राचा मोठा अभ्यासक आपण गमावला आहे.

- शिक्षणतज्ञ व वैज्ञानिक अशी दोन्ही स्वरूपाची ओळख त्यांनी निर्माण केली होती. ‘केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीज’चे ते कुलगुरू होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर मत्स्यतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. 

- त्यामुळेच ते ओमानच्या सुलतानांचे मत्स्य सल्लागार होते. मत्स्यविज्ञानातील अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय मंडळांवर ते सदस्य होते. रामचंद्रन यांचे वडील के.एस.एन मेनन हे स्थानिक काँग्रेसनेते व कोचिनचे महापौरही होते. मात्र रामचंद्रन यांनी राजकारणाशी कधी संबंध ठेवला नाही. नेदरलँड्समधील डेफ्ट तंत्रविद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. 

- आधी ते स्कूल ऑफ इंडस्ट्रियल फिशरीज ऑफ कोचिन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेचे संचालक होते नंतर ते केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीजचे कुलगुरू झाले. 

- या विद्यापीठात त्यांनी मत्स्य व्यवसायाच्या आधुनिक गरजा ओळखून २० नवे अभ्यासक्रम सुरू केले. महासागर पर्यावरण व किनारा क्षेत्र व्यवस्थापन, हवामान बदल अभ्यास, पर्यावरण विज्ञान व आपत्ती व्यवस्थापन हे ते नवीन विषय होते. 

- केरळमधील वेम्बानाड सरोवरातील प्लास्टिक प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी संशोधक म्हणून विशेष प्रयत्न केला होता. रामचंद्रन वैज्ञानिक तर होतेच, पण विद्यार्थ्यांचा कल ओळखून, क्षमता वाढवणारे शिक्षणतज्ज्ञही होते. त्यांनी मत्स्यविज्ञानात काही अव्वल विद्यार्थी घडवण्याचे कामही केले. १३२ विद्यार्थ्यांना त्यांनी संशोधनासाठी मार्गदर्शन केले.

- त्यांच्याच नेतृत्वाखाली गेल्या नोव्हेंबरात पहिली ‘इंटरनॅशनल ब्लू इकॉनॉमी काँग्रेस’ भारतात झाली होती. यापूर्वी आपण अन्नधान्य उत्पादनातील ‘हरित क्रांती’, दुग्धोत्पादनातील धवल क्रांती’ पाहिली. देशाला त्यापलीकडे, मत्स्य उत्पादन वाढीशी निगडित ‘नीलक्रांती’कडे नेणाऱ्यांपैकी महत्त्वाचे तज्ज्ञ असलेल्या रामचंद्रन यांचे जाणे हे देशासाठी मोठी पोकळी निर्माण करणारे आहे.

________________________________________
  ‘रीड द वर्ल्ड’: वाचनाला प्रोत्साहन देणारा IPA, WHO आणि UNICEF या संस्थांचा संयुक्त उपक्रम
______________________________
- कोविड-19 महामारीमुळे जगभरात लागू केलेल्या संचारबंदीमुळे घरातच अडकलेल्या लोकांना तसेच लहान मुला-मुलींना वाचनाची आवड लागावी यासाठी प्रोत्साहन देणारा ‘रीड द वर्ल्ड’ उपक्रम आंतरराष्ट्रीय प्रकाशक संघ (IPA), जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) या संस्थांच्या पुढाकाराने राबविला जात आहे.

- 2 एप्रिल 2020 रोजी आंतरराष्ट्रीय बाल पुस्तके दिनाच्या निमित्ताने या उपक्रमाचे उद्घाटन इटलीच्या ‘गेरोनिमो स्टिल्टन’ या मुलांच्या पुस्तकांची मालिकेच्या लेखकांनी केले. लेखक एलिसाबेटा डॅमी यांनी ‘गेरोनिमो स्टिल्टन’ या लोकप्रिय पात्राची रचना केली.

▪️आतरराष्ट्रीय प्रकाशक संघ (IPA)

- IPA हे जगातल्या प्रकाशक संघटनांचा प्रमुख संघ आहे. संघाची स्थापना 1896 साली झाली. या संस्थेचे उद्दीष्ट प्रकाशनास प्रोत्साहन आणि संरक्षण देणे तसेच आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासासाठी एक शक्ती म्हणून प्रकाशनाबद्दल जागरूकता वाढवणे आहे. संघाचे मुख्यालय झ्यूरिचहून स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा या शहरात आहे.

▪️जागतिक आरोग्य संघटना (WHO)

- WHO ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संघटना आहे. 

- दिनांक 7 एप्रिल 1948 रोजी स्थापन करण्यात आलेल्या WHOचे जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे मुख्यालय आहे. हा संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाची एक सदस्य संस्था आहे. ही आरोग्य संघटना पूर्वी ‘एजन्सी ऑफ द लीग ऑफ नेशन्स’ म्हणून ओळखली जात होती.

▪️सयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF)

- UNICEF बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित आहे. संस्था जगातल्या सर्वात वंचित बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्य करते.

-  संस्थेची स्थापना 11 डिसेंबर 1946 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय न्युयॉर्क शहर (अमेरिका) येथे आहे.

______________________________________
IISc बंगळुरूमध्ये ‘प्रोजेक्ट प्राण’ अंतर्गत स्वदेशी व्हेंटिलेटर विकसित केले
__________________________ 
- बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेमधल्या वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांनी ‘प्रोजेक्ट प्राण’ अंतर्गत स्वदेशी व्हेंटिलेटर उपकरण तयार केले आहे.

-  त्यासाठी लागणारे सुटे भाग वाहननिर्मिती उद्योग आणि RO वॉटर फिल्टर उद्योगांकडून घेतले गेले आहेत.

- कोविड-19 महामारीसाठी सज्ज राहण्याच्या दृष्टीने व्हेंटिलेटर उपकरणांची अत्याधिक गरज भासत आहे. आयात केलेल्या सुटे भागांची कमतरता दूर करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे आणि मोठ्या प्रमाणात उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे.

- व्हेंटिलेटरमध्ये वाहनामध्ये वापरल्या जाणारे प्रेशर सेन्सर आणि रिव्हर्स ऑस्मोसिस वॉटर फिल्टर हे भाग महत्त्वाचे असतात.

- मोठ्या प्रमाणात उपकरणांच्या उत्पादनासाठी संस्था त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान कोणत्याही उद्योगाला विनामूल्य हस्तांतरित करण्यास तयार आहे आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) या कंपनीने यापूर्वीच प्रणालीमध्ये रस दर्शविला आहे.

___________________________________
मिसाइलच्या कारखान्यात इस्रायलने सुरु केली व्हेंटिलेटर्सची निर्मिती
____________________________
- करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करणाऱ्या  इस्रायलने क्षेपणास्त्र उत्पादन निर्मिती केंद्रावर श्वासोश्वासाचे मशीन बनवण्याचे काम सुरु केले आहे. जगातील अन्य देशांप्रमाणे इस्रायल सुद्धा करोना व्हायरसने त्रस्त आहे.

- इस्रायली एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या कारखान्यामध्ये पहिल्या 30 व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्यात आली आहे.

- इस्रायलमध्ये वैद्यकीय साहित्याची निर्मिती करणाऱ्या  Inovytec ने हे व्हेंटिलेटर्स बनवले आहेत. दर आठवडयाला शंभर व्हेंटिलेटर्स बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

- एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या या कारखान्यात अमेरिका आणि इस्रायलसाठी ‘अ‍ॅरो’ मिसाइल डिफेन्स सिस्टिम, सॅटलाइटची निर्मिती केली जाते.

- तर मागच्यावर्षी इस्रायलने सुद्धा चंद्रावर लँडिंगचा प्रयत्न केला होता. त्यासाठी मानवरहीत यानाची निर्मिती सुद्धा इथेच करण्यात आली होती.

______________________________

Previous Post Next Post

DOWNLOAD