चालू घडामोडी : 2 एप्रिल

___________________________________
NASAची ‘सनराइज' मोहीम
_________________________________
● सौर कणांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या संस्थेनी ‘सन रेडिओ इंटरफेरोमीटर स्पेस एक्सपेरिमेंट’ (सनराइज / SunRISE) मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे.

● ही मोहीम कॅलिफोर्नियाच्या पासाडेना येथे असलेल्या NASAच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीद्वारे व्यवस्थापित केले जात आहे.

●  मोहीम वैज्ञानिकांना सूर्यापासून निघणार्‍या सौर कणांच्या वादळाची कारणे अभ्यासण्यास मदत करणार. या अभ्यासामुळे सूर्याच्या किरणोत्सर्गामुळे अंतराळ वातावरणावर कसा परिणाम होतो याविषयी अधिक माहिती मिळवून सौर वादळातून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांचे संरक्षण करण्यात मदत होणार.

● मोहिमेसाठी एक प्रचंड रेडिओ टेलिस्कोप म्हणून कार्यरत असलेल्या सहा ‘क्यूबसॅट’ उपग्रहांच्या जाळ्याचा उपयोग केला जाणार आहे.

● 1 जुलै 2023 पर्यंत या मोहिमेची संरचना तयार करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी 62.6 दशलक्ष डॉलरचा निधी खर्च केला जाणार आहे.

                                  _________________________________
वयक्तीवेध : आरिआन काओली
      _________________________________

- जगातील सध्याच्या अव्वल बुद्धिबळपटूंपैकी एक असलेल्या आर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियानची बुद्धिबळपटू पत्नी आरिआन काओली हिचा अपघाती मृत्यू बुद्धिबळ जगताला हादरवून सोडणारा ठरला. त्याहीपेक्षा दु:खद म्हणजे, बहुतेक प्रसारमाध्यमांच्या मथळ्यांमध्ये दिसून आलेली ‘लेव्हॉन अरोनियानची पत्नी’ इतकीच तिची मर्यादित ओळख तिच्या बहुपैलू व्यक्तिमत्त्वावर अन्याय करणारी ठरली.

-  तिला अवघे ३४ वर्षांचे अल्प आयुष्य मिळाले. पण दीर्घ हयातीत इतरांना जमणार नाही अशी कामगिरी तिने करून दाखवली. ती मूळची फिलिपिन्सची. काही वर्षांनी तिचे कुटुंबीय ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले.

- वयाच्या चौदाव्या वर्षी ती १६ वर्षांखालील आशियाई विजेती ठरली.
ऑस्ट्रेलियात बुद्धिबळाव्यतिरिक्त इतर विशेषत: मैदानी खेळांसाठी पोषक वातावरण असूनही आरिआनने बुद्धिबळाची आवड जोपासली. तिच्या पहिल्या दोन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आरिआनने फिलिपिन्सचे प्रतिनिधित्व केले. मग पुढील पाच ऑलिम्पियाडमध्ये ती ऑस्ट्रेलियाकडून खेळली.

- केवळ बुद्धिबळावरच लक्ष केंद्रित केले असते, तर तिने थक्क करणारी प्रगती केली असती.

 - आशियाई विजेती बनली त्या वर्षी म्हणजे सन २०००मध्ये आरिआनने माजी जगज्जेता अनातोली कारपॉवचा सहायक व्लादिमीर एपिशिन (हा स्वतही उत्तम बुद्धिबळपटू होताच) याला हरवून दाखवले होते. पण बुद्धिबळ तिच्या व्यक्तिमत्त्वाचा केवळ एक पैलू होता. तिने अर्थशास्त्रात पीएच. डी. मिळवली. याशिवाय विविध भाषांमध्ये ती पारंगत होती. उत्तम नृत्यांगना होती.

- अरोनियानशी विवाह झाल्यानंतर ती आर्मेनियामध्ये स्थायिक झाली. तिथल्या मुलांच्या मदतीसाठी दोनच वर्षांपूर्वी तुर्कस्तान, इराण, आर्मेनिया असा २००० किलोमीटरचा सायकलप्रवास तिने केला. आर्मेनियात अनेक कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ आर्थिक सल्लागार म्हणून ती नियुक्त झाली होती.

- सार्वजनिक निधी वितरण आणि धोरण या क्षेत्रात ती आर्मेनियाच्या सरकारची सल्लागार होती. इतक्या व्यापातून ती कधीकधी अरोनियानबरोबर स्पर्धास्थळी उपस्थित राहायची. तिथेही अनेक विश्लेषणात्मक चर्चामध्ये सहभागी व्हायची. विश्वनाथन आनंद आणि त्याची पत्नी अरुणा यांच्याशी तिचा विशेष स्नेह होता.

 - मूळचा फिलिपिन्सचा पण सध्या अमेरिकेकडून खेळणारा वेस्ली सो हा आणखी एक अव्वल बुद्धिबळपटू. त्याला प्रोत्साहन आरिआनकडूनच मिळाले. एका अव्वल बुद्धिबळपटूची पत्नी अशी मर्यादित ओळख चौकट कधीच भेदून आरिआन काओलीने स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यामुळेच तिचे अकाली जाणे बुद्धिबळ विश्वाबाहेरीलही अनेकांसाठी क्लेशकारक ठरले.

_____________________________________________
कतूहल: निसर्गनिष्ठ पंथ
____________________________________________

- गेल्या काही दशकांमध्ये निसर्ग व पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी सर्वसामान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात संवेदनशीलता आणि जागरूकता निर्माण झालेली दिसते. त्यामुळेच अशाश्वत, पर्यावरणाला हानी पोहोचवण्याची क्षमता असलेल्या विकासात्मक प्रकल्पांच्या विरोधात विविध प्रकारची आंदोलने संघटितपणे उभी राहिलेली दिसतात.

-  विख्यात अमेरिकी वन्यजीव शास्त्रज्ञ रेचेल कार्सन यांनी लिहिलेले ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक १९६२ साली प्रकशित झाले आणि या पुस्तकाच्या प्रभावात आधुनिक काळातील पर्यावरणविषयक चळवळी उदयास आल्या.

- परंतु तब्बल ५७० वर्षांपूर्वीच भारतातल्या मारवाड प्रांतात गुरू जम्भेश्वर किंवा जाम्भोजी या नावाने प्रसिद्ध झालेल्या महान भारतीय संतांनी निसर्गाचे संरक्षण करण्याची शिकवण दिली होती.
उपलब्ध संदर्भानुसार, गुरू जम्भेश्वर यांचा जन्म इ.स. १४५१ साली झाला.

-  बाल्यावस्थेत ते सदैव विचारमग्न व अंतर्मुख असत. गावातील गाईगुरांना चरायला घेऊन जाऊन निसर्गात रममाण होणे, हा त्यांचा रोजचा दिनक्रम असे. यातूनच त्यांचे निसर्गप्रेम वाढीला लागले असावे. हे गुरू जाम्भोजी अत्यंत प्रतिभाशाली संत होते. वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांनी आपल्या प्रतिभेच्या आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर लोकांना उपदेश देण्यास सुरुवात केली.

-  सन १४८५ मध्ये मारवाड प्रांतात भयंकर दुष्काळ पडला होता. दुष्काळपीडित जनता तो प्रांत सोडून जाण्याची तयारी करू लागली. परंतु जम्भेश्वरांनी त्यांना उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने सर्व प्रकारचे साहाय्य आणि मार्गदर्शन केले. त्यांचे विचार ते काव्यमय रचनेत मांडत. त्यास ‘शब्दवाणी’ असे म्हटले जाते. 

- मारवाड प्रांतातील जनसामान्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी त्यांनी २९ मार्गदर्शक तत्त्वे सांगितली. ही तत्त्वे अनुसरणाऱ्या मंडळींना एकत्र करून ‘बिष्णोई’ (बिश म्हणजे २० + नोई म्हणजे नऊ) पंथाची स्थापना त्यांनी केली.
निसर्गातील सर्व घटकांवर मनापासून प्रेम करा आणि त्यांच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी प्रसंगी प्राणांची बाजी लावा, ही मूलभूत शिकवण त्यांनी रुजवली.

-  खेजडी (प्रोसोपिस सिनेरेरिया अर्थात शमी/शबरी) हा वृक्ष बिष्णोई पवित्र मानतात. इतके की, १७३० साली राजस्थानच्या जोधपूरमधील खेजडली गावात या वृक्षाच्या रक्षणासाठी तब्बल ३६३ बिष्णोईंनी प्राणांचे बलिदान दिले होते. एक प्रकारे २९० वर्षांपूर्वी केले गेलेले हे ‘चिपको आंदोलन’च होते. 

- आजही बिष्णोई पंथ जम्भेश्वरांची शिकवण आपल्या दैनंदिन व्यवहारात तंतोतंत पाळतो आहे. हरियाणाच्या हिसारमध्ये जम्भेश्वरांच्या नावे विज्ञान-तंत्रज्ञान विद्यापीठही स्थापन झाले आहे.

___________________________________________


Previous Post Next Post

DOWNLOAD